इच्छुकांना लागले आमदारकीचे वेध

वाढदिवसानिमित्त सचिन दोडके यांचे जोरदार ‘प्रमोशन’


           नमस्कार पुणे  ः    विधानसभा निवडणुकीला अद्याप अडीच वर्षे अवधी असला तरी इच्छुकांनी मात्र आतापासूनच जोरदार तयारी सुरू  केली आहे. वारजे येथील नगरसेवक सचिन दोडके यांनी वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सच्या माध्यमातून ‘भावी आमदारा’चे चित्र रेखाटत राष्ट्रवादीतील अन्य इच्छुकांना जोरदार धक्का दिला आहे.
           आमदार भीमराव तापकीर हे सलग दुसर्‍यांदा खडकवासला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मनसेचे आमदार स्व. रमेश वांजळे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नगरसेवक असलेल्या भीमराव तापकीर यांनी पहिल्यांदा बाजी मारली. त्यानंतर मोदी लाटेत झालेल्या सार्वजनिक निवडणुकीतही त्यांनी विजयी पताका फडकत ठेवली. आता निवडणुकीला अडीच वर्षे वेळ असला तरी राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांनी आतापासूनच शड्डू ठोकण्यास सुरवात केली आहे. खडकवासल्याच्या जागेवर राष्ट्रवादीकडून माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, दिलीप बराटे, विकास दांगट यांचा दावा आहे. परंतु माती आणि राजकीय अशा दोन्ही मैदानातील कसलेला पैलवान असलेल्या दोडके यांनी सर्वप्रथम आपली उमेदवारीच जाहीर केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील या अन्य इच्छुकांमध्येच चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. 
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सचिन दोडके हे वारजे-माळवाडी प्रभागातून सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रभाग क्रमांक 32 मधून राष्ट्रवादीचे चारही उमेदवार विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एकीकडे मोदी लाटेत भले भले वाहून जात असताना दोडके यांनी तब्बल 9 हजार 800 एवढे प्रचंड मताधिक्य खिशात घातले. 
           त्यांनी 2013 मध्ये महापौर चषक आणि 2016 मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून खेळाच्या मैदानातून राजकीय मैदान मजबूत करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे सध्या पालिकेपासून पार्लमेंटपर्यंत सर्वत्र मोदींचा बोलबाला असतानाही दोडके यांनी ‘भावी आमदार’ म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करून मोठे धाडस केले आहे. 
वारजे भागात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम, नाट्यगृह, समाजमंदिर, महिला प्रशिक्षण केंद्र, दुमजली स्पोर्ट कॉम्प्लेक्स आदी विकासकामे त्यांनी केली आहेत. एनडीएच्या ताब्यात असलेला शिंदे पूल ते गणपती माथा हा रस्ता महापालिकेकडे घेऊन शिवणे, कोंढवे, कोपरे, उत्तमनगर या गावांचा मोठा प्रश्न त्यांनी सोडविला आहे. तसेच अकरा अ‍ॅमिनिटी स्पेस ताब्यात घेऊन वेगवेगळ्या प्रकारची अकरा मैदाने विकसित करून क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे. 
           त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक भागात ‘भावी आमदार’ म्हणूनच कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळे आधी पक्षांतर्गत स्पर्धकांवर मात करून ‘खडकवासल्या’ला धडक देण्यास निघालेले दोडके हा गड कसा सर करतात, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 
इच्छुकांना लागले आमदारकीचे वेध इच्छुकांना लागले आमदारकीचे वेध Reviewed by Unknown on 8:24 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads