...म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत राज्यात एकमेव !!!
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : इमारतीला आग लागल्यास किमान अर्धा तास तरी ती भडकणार नाही. त्यामुळे येथील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविता येणार आहे. अशा प्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातील एकमेव अग्निरोधक कार्यालय ठरले आहे.
ससून रुग्णालयासमोर जिल्हाधिकारी कार्यालयाची पाच मजली देखणी इमारत येणार्या-जाणार्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. या इमारतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर ही संपूर्ण इमारत अग्निरोधक बनविण्यात आली आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या फर्निचरचा वापर करण्यात आला असून त्यासाठी पाच कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च होणार आहे. शिवाय विशिष्ट तापमान झाल्यास येथील अग्निशमन यंत्रणा आपोआप कार्यान्वित होऊन पाण्याचे फवारे उडतील अशीही यंत्रणा येथे बसविण्यात आली आहे. एवढेच नाही तर सहा रिश्टर स्केलचा भुकंपातही ही इमारत सुरक्षित राहिल याची काळजी घेण्यात आली आहे. अशा प्रकारची इमारत असलेले पुणे जिल्हाधिकारी कार्यालय हे राज्यातील पहिले कार्यालय ठरणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली.
आतापर्यंत या कामावर 67 कोटी रुपये खर्च झाला आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक सभागृह आहे. अंतर्गत रस्ते, सीमा भिंत आणि इतर कामांसाठी 2 कोटी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत. अजूनही कार्यालयात लागणार्या खुर्च्या, सोफा अशा विविध प्रकारच्या साहित्यासाठी 11 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
...म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत राज्यात एकमेव !!!
Reviewed by Unknown
on
8:13 AM
Rating:

No comments: