गलानी फॅशन गॅलक्सी आणि कामगारांमधील वाद चिघळला


‘गलानी’च्या व्यवस्थापनावर अदखलपात्र गुन्हा



नमस्कार पुणे : प्रतिनिधी : के. के. मार्केट येथील ‘गलानी फॅशन गॅलक्सी’ आणि कामगार यांच्यातील वाद चिघळला आहे. कामगारांना धक्काबुक्की केल्याच्या तक्रारीवरून गलानी फॅशन गॅलक्सीच्या व्यवस्थापकाविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
गोपाल आणि शर्मा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कामगार विजय शंकरराव भोसले (वय 55, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सुमारे महिन्याभरापासून गलानी फॅशन आणि कामगार यांच्यातील वाद धुमसत आहे. व्यवस्थापनाने कोणतीही नोटीस न देता कामावरून कमी केल्याचा आरोप विनोद वैष्णव आणि विजय भोसले या कामगारांनी केला आहे. व्यवस्थापनाच्या या कारवाईविरोधात कामगारांना संघटनेच्या सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला असता व्यवस्थापनाने आणखी कामगारांना कमी करण्यास सुरवात केली. 26 एप्रिल रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेले असता व्यवस्थापक शर्मा आणि गोपाल यांनी कामावर येण्यास मज्जाव करत धक्काबुक्की केली आणि दुकानावरून हाकलून दिले, अशी तक्रार भोसले यांनी दिली आहे. सहाय्यक कामगार आयुक्तांकडेही याबाबत तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली. हा कामगारांवरील अन्याय असून सर्व कामगारांना तातडीने कामावर घ्यावे, अन्यथा कठोर आंदोलन करण्याचा इशारा विनोद वैष्णव यांनी दिला आहे.  
सहाय्यक कामगार आयुक्त डी. आर. देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ‘गलानी फॅशन गॅलक्सी’ या आस्थापनेतील कामगारांची तक्रार आल्याचे त्यांनी मान्य केले. याबाबत तातडीने ‘इन्स्पेक्शन’ करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

                भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस निहल घोडके यांनीही सहाय्यक कामगार आयुक्त डी. आर. देशमुख यांना पत्र देऊन ‘गलानी फॅशन गॅलक्सी’च्या रुपा गलानी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, ‘‘गलानी फॅशन गॅलक्सी येथील कामगारांना गेल्या पंधरा वर्षांपासून रजेचा पगार मिळालेला नाही. जादा वेळ काम केल्यानंतरही या जादा कामाचे पैसे कामगारांना दिले जात नाहीत. तसेच कामगारांचा सप्टेंबर 2016 पर्यंतचा पीएफही व्यवस्थापनाने भरलेला नाही.’’ 
याबाबत ‘गलानी’चे नरेश गलानी यांच्याशी संपर्क साधला असता, कमचार्‍यांना धक्काबुक्की केली नसल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, ‘‘सर्व कायदेशीर देणी दिल्यानंतरच कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले आहे. त्यानंतरही काही कामगार दुकानात घुसत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. याबाबत पोलिसांनाही माहिती दिली आहे. व्यवसायात मंदी असल्यामुळे सर्व कर्मचार्‍यांना मी पगार देऊ शकत नाही. कामगार आयुक्तांकडे कर्मचार्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशीस सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.’’
गलानी फॅशन गॅलक्सी आणि कामगारांमधील वाद चिघळला गलानी फॅशन गॅलक्सी आणि  कामगारांमधील वाद चिघळला Reviewed by Unknown on 8:48 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads