बिल्डरांचे धाबे दणाणले !!!
अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी आता टाइमटेबल !नमस्कार पुणे, ऑनलाईन न्यूज :- लोहगाव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत ‘पीएमआरडीए’ ने तब्बल सात रो-हाऊसचे 9 हजार 500 चौ. फूट क्षेत्रफळ बांधकाम जमीनदोस्त केले आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाईने आता वेग घेतला असून अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचा आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरणकुमार गिते यांनी दिला आहे.

महापालिकेच्या हद्दीबाहेर हजारो अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. बांधकामांच्या सर्व नियमांना पायदळी तुडवत बिल्डरांनी अक्षरशः सिमेंटचे बटबटीत जंगल उभे केले आहे. कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरून येणार्या नागरिकांना कमी पैशात येथील घरे विकून हे बिल्डर खिसे भरत आहेत. नियमांची व्यवस्थित माहिती नसल्याने आणि कमी पैशात घर मिळत असल्याने अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिक या भागात खरे खरेदी करतात. परंतु यामुळे या गरीब नागरिकांचा खिसा कापला जात आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती, आग, भूकंप आदी प्रसंगी येथे मदतकार्य करणेही अशक्य होणार आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत बांधकामांपैकी काही बांधकामांना दंड आकारून परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तथापि, यातील 1650 बांधकामे ही कोणत्याच नियमात बसत नसल्याने ती भुईसपाट करण्यासाठी पीएमआरडीएकडून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार आहे.
गेल्याच आठवड्यात एस. ए. इन्फ्रा या खासगी एजन्सीची नेमणूक यासाठी करण्यात आली. नर्हे येथील चार मजली अनधिकृत इमारत पाडून या एजन्सीने कामाला सुरवात केली. यात तब्बल 2200 चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. तर शुक्रवारी (ता. 2) लोहगांव येथील स. नं. 46/23 येथील नितीन नागनाथ डाळे यांचे आणि स. नं. 45/3 येथील महेश बाळासाहेब खांदवे यांचे चालू असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. त्यानंतर लोहगाव येथे झालेल्या कारवाईत तब्बल सात रो हाऊसचे 9 हजार 500 चौ. फूट क्षेत्रफळाचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती गिते यांनी दिली. आयुक्त किरणकुमार गिते आणि उपजिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विकास भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.
लोहगावात सात रो-हाऊस पाडली !
Reviewed by Unknown
on
6:16 AM
Rating:

No comments: