धनकवडीत पोटनिवडणुका नाहीत !!
हायकोर्टाची स्थगिती; बाळासाहेब धनकवडे यांना दिलासा
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज ः धनकवडी प्रभाग क्र. ३९ येथे पोटनिवडणुका घेण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर उर्फ बाळासाहेब धनकवडे यांचे नगरसेवकपद महापालिका आयुक्तांनी रद्द केल्यानंतर येथे पोटनिवडणुकीच्या चर्चेने जोर धरला होता. न्यायालयाच्या आदेशामुळे धनकवडे यांना दिलासा मिळाला असून पोटनिवडणुकीच्या चर्चेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयानंतर बाळासाहेब धनकवडे यांच्या कार्यकर्त्यांनी धनकवडीत जल्लोष केला.
बाळासाहेब धनकवडे धनकवडी-आंबेगाव पठार, प्रभाग ३९ अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या आरक्षित जागेवर तब्बल सात हजार मताधिक्याने निवडून आले होते. धनकवडे यांनी नगरसेवकपदासाठी कुणबी असल्याचा दाखला दिला होता. त्यांच्या दाखल्याबाबत मृणाल ढोले यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले होते.
याबाबत धनकवडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर 10 जुलै रोजी सुनावणी होणार होती. मात्र, तत्पूर्वीच आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात त्यांचे नगरसेवकपद रद्द केले होते. त्यामुळे धनकवडीत पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली होती. काहींनी निवडणुकीच्या दृष्टीने हालचालीही सुरु केल्या होत्या.
आयुक्तांच्या आदेशावर धनकवडे यांनी उच्च न्यायालयात अपील करून प्रभागात पोटनिवडणुका घेण्यास स्थगिती देण्याची विनंती केली होती. ती मान्य करून उच्च न्यायालयाने धनकवडे यांना आपली बाजू मांडण्याची संधी देत पुढील आदेश देईपर्यंत पोटनिवडणूक घेण्यास स्थगिती दिली. या निर्णयानंतर धनकवडे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली.
धनकवडीत पोटनिवडणुका नाहीत !!
Reviewed by Unknown
on
8:13 AM
Rating:

No comments: