फुकटखाऊ अब्दुल गणी खान टोळीला ‘मोक्का’
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज ः हॉटेलमध्ये फुकट खाणार्या आणि खंडणी उकळणार्या अब्दुल गणी खान टोळीतील चौघांविरोधात पोलिसांकडून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. अब्दुल गणी खान, अक्षय राकेश नाईक, अक्षय अंकुश माने (तिघेही रा. घोरपडे पेठ) आणि अक्रम नासीर पठाण (रा. औंध, डी.पी. रोड) अशी ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केलेल्यांची नावे आहेत. अब्दुल गणी खान हा टोळीप्रमुख असून तो त्याच्या साथीदारांसह खडक पोलिस ठाण्याच्या परिसरात गरीब नागरिक व व्यावसायिकांना मारहाण करून आणि धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत. हॉटेलांमध्ये दमदाटी करून फुकट जेवण करून जात असत. त्यांच्या या नेहमीच्या त्रासाला परिसरातील नागरिक चांगलेच त्रासले होते.
अब्दुल गणी खान याची टोळी 2004 सालापासून कार्यरत असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2012 मध्ये त्यांना शहर व जिल्ह्यातून हद्दपारही करण्यात आले होते. तरीही त्यांच्या कारवाया काही थांबत नव्हत्या. अखेर या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी अप्पर पोलिस आयुक्त सेनगावकर यांच्याकडे पाठविला होता. तो मान्य करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
खंडणी, जबरी चोरी, टोळीयुद्ध करणार्या शहरातील तब्बल नऊ टोळ्यांविरोधात पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. पोलिसांच्या या खंबीर भूमिकेमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यास मोठी मदत झाली आहे.
फुकटखाऊ अब्दुल गणी खान टोळीला ‘मोक्का’
Reviewed by Unknown
on
9:41 AM
Rating:
No comments: