नमस्कार पुणे, प्रतिनिधी : धनकवडीतील गुलाबनगर ते शाहू बँक यादरम्यान पी1पी2 करण्याचा निर्णय पोलिसांच्या वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेल्या गुलाबनगरची सुटका होण्यास मदत होणार आहे.
धनकवडी परिसरात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. परिणामी वाहनांची संख्याही प्रचंड मोठी आहे. धनकवडीचा शेवटचा बसस्टॉप परीसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. पोलिस चौकीपुढे रस्त्यावरच भरणारी भाजीमंडई, मजूर अड्डा यामुळे सकाळ-संध्याकाळ या भागातून मार्गक्रमण करणे हे कठीण होते. बसस्टॉपपासून गुलाबनगरच्या दिशेचा रस्ता फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांनी व्यापलेला असतो. मध्येच वेडीवाकडी लावलेली दुचाकी वाहने यामुळेही येथे मोठी वाहतूक कोंडी होते. या रस्याने पीएमपी बस वाहतूक होत असल्याने दोन गाड्या आल्यास आजूबाजूच्या कोंडीमुळे त्यांना मार्ग काढता येत नाही. परिणामी संपूर्ण रस्ता कोंडीत अडकतो. पुढे गुलाबनगर चौकातून हत्ती चौकाकडे जाणार्या वाहनांची मोठी संख्या आहे.
शहरात जाणारी दुचाक आणि हलकी वाहने ही चव्हाणनगर, सहकारनगर मार्गे जात असल्यामुळे भारती विद्यापीठ, आंबेगाव आणि धनकवडीतील वाहनांचा लोंढा थेट गुलाबनगर चौकात येऊन आदळतो. येथेही भाजी आणि फळविक्रेते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी केलेली वाहने यामुळे गुलबानगर चौक नेहमीच कोंडीत अडकलेला असतो. त्यातच अनेकदा पीएमपी बस बंद पडत असल्याचा अनुभवही येथील नागरिकांनी घेतलेला आहे. त्यामुळे गुलाबनगर ते बालाजीनगर येथील शाहू बँक यादरम्यान पी 1 पी 2 पार्किंग करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे.
याबाबतचा आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी काढला आहे. आता या निर्णयाची चोख अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक वाहतूक शाखेचे पोलिस कशी पार पाडतात हे महत्त्वाचे आहे.
गुलाबनगर रस्त्यावर आता पी1-पी2 पार्किंग करणार
Reviewed by Unknown
on
6:40 PM
Rating:

No comments: