यंदाच्या महापालिका बजेटमध्ये निधीची तरतूद नाही
नमस्कार पुणे, प्रतिनिधी : धनकवडीसोबतच सातारा रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या डीपी रस्त्याला महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या बारा वर्षाहून अधिक काळापासून प्रलंबित असलेला हा रस्ता पूर्ण होण्यासाठी पुढील वर्षभर तरी कोणत्याही हालचाली होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ या भागातील वाढत्या शहरीकरणामुळे येथे वाहतुकीचीही समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. बालाजीनगर येथील उड्डाणपुल आणि त्रिमूर्ती चौक ते पोस्ट ऑफिस चौक यादरम्यानच्या रस्ता रुंदीकरणामुळे वाहतुकीच्या कोंडीतून काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता धनकवडीच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील संपूर्ण
वाहतुकीचा ताण हा धनकवडीवर येतो. त्यामुळे येथील सर्वच गल्लीबोळातील रस्ते वाहनांनी भरलेले असतात. या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी 2004 च्या विकास आराखड्यात दर्शविलेला महापालिकेच्या हद्दीवरील डीपी रस्ता विकसित होणे आवश्यक आहे. नगरसेवक विशाल तांबे यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असतात 14 कोटी रुपये प्रकल्पिय खर्च असलेल्या या रस्त्याला चालना दिली. अंदाजपत्रकात निधीची तरतूदही केली होती. त्यामुळे या रस्त्याचे काही प्रमाणात काम झाले. परंतु पूर्ण रस्ता होण्यासाठी अद्याप अनेक अडथळे आहेत. खासगी आणि वनविभागाची जागा ताब्यात घेऊन तातडीने हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. हा रस्ता विकसित झाल्यास धनकवडीतील रस्त्यांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. परंतु महापालिकेच्या 2017-17 च्या बजेटमध्ये या रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे आणखी वर्षभर तरी हा रस्ता पूर्ण होण्याच्या आशा पूर्णतः मावळल्या आहेत.
महापालिकेच्या हद्दीवरील हा डीपी रस्ता होण्यासाठी अप्पा रेणुसे यांच्यासह मी अनेक दिवसांपासून प्रयत्नशील आहोत. या रस्त्याचे काम तातडीने होणे आवश्यक आहे. या भागातील विकासामुळे वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता हा डीपी रस्ता वेगाने विकसित न झाल्यास दक्षिण पुण्यातील नागरिक पुन्हा वाहतुकीच्या कोंडीत अडकणार आहेत.
- विशाल तांबे, नगरसेवक
डीपी रस्ता प्रलंबितच
Reviewed by Unknown
on
6:51 PM
Rating:

No comments: