समन्वय चषकासह पोलिसांनी जिंकली मने!



क्रिकेट... सर्वांच्या आवडीचा विषय. एरवी जिंकणे हेच ध्येय घेऊन खेळाडू मैदानात उतरतात. मात्र, विविध क्षेत्रात फटकेबाजी करणारी मंडळी रविवारी क्रिकेटच्या मैदानात उतरली ती सामाजिक सलोखा आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यासाठी. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित ‘समन्वय चषक’ स्पर्धेने हार आणि जीत या पलीकडे जाऊन खेळण्याचा आनंद दिलाच. त्याबरोबरच समाजातील विविध घटकांत संवादातून ‘समन्वय’ साधण्याचे कामही या स्पर्धेने केले.
                                                                                                                           - सोमनाथ गर्जे

            वकील, डॉक्टर, व्यापारी, राजकीय मंडळी, आजी-माजी नगरसेवक, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार आणि पोलिस असे समाजातील सर्वच घटक समन्वयक चषक स्पर्धेत सहभागी झाले होते. एरवी राजकीय मैदानात एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारी मंडळी एकत्र संघभावनेने, हास्य-विनोद करत विरोधी संघाशी दोन हात करण्याचा आनंद लुटत होती. तरुण नगरसेवक युवराज बेलदरे कर्णधार असलेल्या आजी-माजी नगरसेवक संघाने तर उपांत्य फेरीपर्यंत आपले आव्हान राखले होते. परंतु अनुभवी आणि तगड्या अशा पोलिस आणि वकील या संघांमध्ये अंतिम सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा ताणणार्‍या या स्पर्धेत पोलिस संघाने ‘समन्वय चषका’वर आपले नाव कोरले. वकील संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जय-पराजयापेक्षा सर्वच संघांनी या स्पर्धेत खेळण्याचा निखळ आनंद घेतला, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य होते.

   भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून हा ‘सामाजिक उपक्रम’ राबविण्यात आला. ‘वृक्षसंवर्धन आणि पाणी वाचवा’ हे या स्पर्धेचे ब्रीद होते. सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक व पोलिस यांच्यातील परस्पर संबंध वाढून सलोख्याचे आणि शांततेचे वातावरण कायम रहावे, हा या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे विजसिंह गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले. पारितोषिक वितरण प्रसंगी स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजीराव पवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रमाची शृंखला अशीच कायमस्वरुपी राखली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
क्रिकेट हे समाजाला एकत्र आणून पुढे नेण्याचे माध्यम होऊ शकते याची झलक या स्पर्धेच्या निमित्ताने पहावयास मिळाल्याचे गौरवोद्गार रणजीपटू धीरज जाधव यांनी यावेळी काढले. तर ‘समन्वय चषक’ हा एक पॅटर्न निर्माण व्हावा, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते बाबा शिंदे यांनी व्यक्त केली. अ‍ॅड. दिलीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. संभाजी कारंडे, राहुल माने आदी उपस्थित होते.
समन्वय चषकासह पोलिसांनी जिंकली मने! समन्वय चषकासह पोलिसांनी जिंकली मने! Reviewed by Unknown on 10:39 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads