हल्लेखोर वेटरला ठोकल्या बेड्या!



पगार दिला नाही म्हणून हॉटेलमालकाच्या डोक्यात बांबूने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या वेटरला भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून ताब्यात घेतले. तब्बल दहा दिवस कसून शोध घेऊन आरोपीस जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांच्या तपास पथकाला यश आले. त्यांनी जिंकलेल्या या अडथळ्याच्या शर्यतीचा वृत्तांत खास ‘नमस्कार पुणे’च्या वाचकांसाठी. 

                       - सोमनाथ गर्जे 


कात्रज-कोंढवा रस्त्यावर आनंद दत्तात्रेय तांबे यांचे शिवम हॉटेल आहे. येथे देवराज भुकदेव सिंग हा सहा महिन्यांपासून वेटर म्हणून काम करत होता. त्याने मालकाला पगाराचे पैसे मागितले असता मालकाने दिले नाही. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचा राग देवराज सिंगच्या मनात खदखदत होता. रात्री हॉटेलची सर्व कामे उरकल्यानंतर अन्य वेटर झोपण्यासाठी गेले. त्यावेळी मालक तांबे हे एकटेच कॅश काऊंटरवर होते. ही संधी साधत भुकदेव सिंगने निबर बांबू त्यांच्या डोक्यात मारून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते जबर जायबंदी होऊन कोसळले. त्यानंतर गल्ल्यातील पाच हजार रुपये, त्यांचे दोन मोबाईल, एटीएमकार्ड घेऊन आरोपी फरार झाला. ही घटना 24 मार्च रोजी घडली. 
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी या गुन्ह्याच्या तपासाची धुरा पीएसआय उत्तम बुदगुडे यांच्यावर सोपविली. आरोपी हरिद्वार येथे असल्याची माहिती तांत्रिक तपासातून पुढे आली होती. त्यामुळे बुदगुडे यांनी पोलिस कर्मचारी विनोद भंडलकर, प्रदीप गुरव, गणेश सुतार, समीर बागसीराज आणि श्रीधर पाटील या सहकार्‍यांसह 10 मे रोजी थेट हरिद्वार (उत्तराखंड) गाठले. चारचाकी गाडीने दोन दिवसांचा प्रवास, भाषेची अडचण, संपूर्ण पहाडी भाग, प्रचंड उष्णता आणि गर्दी अशा प्रतिकूल परिस्थितीत या पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. स्थानिक रिक्षावाले, दुकानदार, हॉटेलचालकांकडे चौकशी केली. आरोपीला अनेकदा वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन केले, परंतु तो प्रतिसाद देत नव्हता. स्थानिक नागरिकांचेही फोन तो घेत नव्हता. त्यामुळे त्याला कसे शोधायचे, हा प्रश्न पोलिसांना पडला. तब्बल आठवडा झाला तरी आरोपीचा माग लागत नव्हता. तपास पथकातील सहा जणांचा खर्चही वाढत चालला होता. 
हरिद्वार म्हणजे तिर्थक्षेत्र. त्यामुळे वेगवेगळे आश्रम, हॉटेल, ढाबे कुठेही जा, प्रचंड गर्दी. त्यातच मे महिन्यातील उन्हात घामाच्या धारांनी संपूर्ण अंग ओले चिंब होत होते. अशात सकाळी सात वाजल्यापासून तपास पथकातील कर्मचारी आरोपीचा शोध घेत हरिद्वारमधील रस्ते आणि गल्लीबोळ पिंजून काढत होते. स्थानिकांना त्याचा फोटो दाखवूनही उपयोग झाला नाही. अखेर निराश झालेल्या पथकाने माघारी परतण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी बुदगुडे यांचा फोन खणखणला. तेथील स्थानिक दुकानदाराचा हा फोन होता. त्याने तातडीने पोलिसांना बोलावले.


इकडे आरोपीने त्याच्या फोनवर आलेल्या स्थानिक फोन क्रमांकावर त्याच्या मित्राला फोन करण्यास सांगितले. त्यानुसार त्याच्या मित्राने स्थानिक नागरिकाला फोन करून विचारणा केली. तेव्हा चांगल्या पगारावर वेटरची आवश्यकता असल्याची माहिती या स्थानिकाने त्याला दिली. सगळे बोलणे स्थानिक भाषेतून असल्यामुळे आरोपीच्या मित्रालाही शंका आली नाही. त्या स्थानिकाने सध्या कोठे काम करता, असे सहज विचारले. तेव्हा गुरुनानक हॉटेल येथे वेटर म्हणून काम करत असल्याची माहिती त्याने दिली. हा सगळा वृत्तांत त्या स्थानिकाने पोलिसांना दिला. त्यानुसार तपास पथक जेवणाच्या बहाण्याने गुरुनानक हॉटेलमध्ये गेले. तेथे वेटरचे काम करत असलेला आरोपी देवराज सिंग हा पथकाच्या नजरेतून सुटला नाही. वेळ न दवडता तातडीने त्याला बेड्या घातल्या.
पीएसआय उत्तम बुदगुडे यांचे नेतृत्त्व आणि विनोद भंडलकर, प्रदीप गुरव, गणेश सुतार, समीर बागसीराज, श्रीधर पाटील यासारख्या खंद्या सहकार्‍यांचे कष्ट यामुळे सलग दहा दिवस शोध घेतल्यानंतर आरोपीला पकडण्यात यश आले. त्यामुळेच देवराज सिंग हा आरोपी कारागृहाची हवा खात आहे.
हल्लेखोर वेटरला ठोकल्या बेड्या! हल्लेखोर वेटरला ठोकल्या बेड्या! Reviewed by Unknown on 6:39 PM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads