सध्याचं युग सोशल मिडियाचं युग आहे. नवरा बायकोशी आणि आई मुलाशी व्हॉटस अॅप वरूनच बोलतेय. मोबाईल हे जीवनावश्यक साधन बनलं आहे तर व्हॉटस् अॅप, फेसबुक, ट्विटर ही संवादाची माध्यमं झाली आहेत. सोशल मिडियामुळे माणसं व्यक्त होऊ लागली. पण थेट संवाद मात्र लुप्त झाला. त्यामुळे मानसिक ताण मात्र वाढत चाललाय. त्याचे दुष्परिणामही दिसू लागलेत. कुटुंब दुरावत चाललंय. नाती विस्कटत चालली आहेत. घरोघरी कौटुंबिक समस्या निर्माण होताहेत. नवरा नीट वागत नाही.. मुलगा सांभाळत नाही.. प्रेमाला घरचे मान्यता देत नाहीत.. मैत्रिण पूर्वीसारखी बोलत नाही.. सासूशी पटत नाही.. अशा प्रकारच्या अनेक समस्या आयुष्यात तणाव निर्माण करत असतात. याबाबत कुणाशी तरी बोलावं, कुणाचा तरी सल्ला घ्यावा, असं अनेकांना वाटतं. मात्र बोलावं कुणाकडे, हा प्रश्न असतोच. तुम्हाला मनातलं सारं काही बोलता यावं, यासाठी आम्ही तुम्हाला देतोय आपल्या मनातलं व्यक्त करण्याची हक्काची जागा.. आपली समस्या 9527747806 या व्हॉटस् अॅप क्रमांकावर नावासह थोडक्यात लिहून पाठवा. आपले नाव किंवा वैयक्तिक माहिती प्रसिद्ध केली जाणार नाही. आपल्या प्रश्नावर तज्ज्ञ समुपदेशक उत्तरे देतील. ती या सदरात प्रसिद्ध केली जातील. तर मग चला मित्रांनो, आयुष्यावर बोलू काही...


नवरा रात्री उशीरापर्यंत चॅटींग करतो
प्रश्न : मी 26 वर्षाची विवाहित स्त्री असून लग्नाला चार वर्षे झाली आहेत. मिस्टर एका कंपनीत नोकरी करतात. दोन वर्षाची मुलगी आहे. तीन-चार महिन्यांपासून माझे मिस्टर रात्री एक-एक वाजेपर्यंत मोबाईलवर चॅटींग करतात. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मग सकाळी उठल्यावर चीडचीड करतात. मी विचारले, कोणाशी बोलताय, तर म्हणतात, शाळेतील मित्र-मैत्रिणींचा ग्रुप आहे, त्यावर चॅटींग चालतं. दिवसा सगळेजण कामात असतात. त्यामुळे रात्री बोलतो. मी म्हणते, रोज रोज काय बोलायचं मित्र-मैत्रिणींशी? आपला संसार नीट करावा की नाही? मला वेगळीच शंका येते. ते एका मुलीशी चॅटींग करत असतात, असे वाटते. पण मला मोबाईलमधले इतके काही कळत नाही. मी माझ्या बहिणीला सांगितले, तर ती म्हणते, सरळ मिस्टरांना याबाबत विचार. मी काय करू?

उत्तर : रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर चॅटींग करणे योग्य नाहीच. त्यामुळे शरीरावर तर परिणाम होईलच. पण तुमच्या नात्यावरही याचा परिणाम होत आहे. याबाबत एखाद्या निवांत क्षणी पतीशी बोला. शांततेने तुमचे मत मांडा. पण पती कोणाशी चॅटींग करतात, याबाबत खात्री नसताना त्यांच्यावर संशय घेणे चुकीचे आहे. त्यातून तुमचा एकमेकांवरील विश्वास तुटेल. त्यामुळे पती कोणाशी चॅटींग करतात, याचा आधी शोध घ्या. त्यासाठी हवं तर बहिणीची किंवा इतर कुणाची तरी मदत घ्या. मात्र, उगाच सुतावरून स्वर्ग गाठू नका. नात्याला एकदा संशयाचे ग्रहण लागले, की ते सुटणे अवघड असते. त्यामुळे विचार करून पाऊल उचला.
नवरा रात्री उशीरापर्यंत चॅटींग करतो
Reviewed by Unknown
on
6:39 PM
Rating:

No comments: