पॉलिशच्या बहाण्याने दागिनेचोरीचे बारा गुन्हे उघडकीस; 9 लाखाचा ऐवज जप्त
नमस्कार पुणे ऑनलाईन :- सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक करणार्या परराज्यातील आठ जणांच्या टोळीच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या आरोपींनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी केलेले 12 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 8 लाख 83 हजार रुपये किमतीचे 27 तोळे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कारवाई परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त डॉ. प्रविण मुंडे , स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी पवार आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे, तपास पथकाचे प्रमुख समाधान कदम, अरूण मोहिते, महेश मंडलिक, गणेश चिंचकर, उज्ज्वल मोकाशी, प्रणव संकपाळ, अमोल पवार, सरफराज देशमुख, कुंदन शिंदे, अभिजित रत्नपारखी, अर्जुन पवार आणि नेताजी कांतागळे यांच्या पथकाने केली.
दागिन्यांना पॉलिश करणारा एकजण भिलारेवाडी येथे असल्याची माहिती पोलिस कर्मचारी महेश मंडलिक यांना मिळाली होती. त्यानुसार पीएसआय समाधान कदम यांच्या पथकाने त्याला सापळा लावून अटक केली. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. यावेळी त्याच्याकडील सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये भांड्यांना पॉलिश करण्याची पावडर आणि ब्रश सापडला.
याप्रकरणी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने तो महिलांची फसवणूक करत असल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार त्याचे अन्य साथीदार राजा रामबरण यादव (वय 24), मुदल्लद सलाउद्दीन शेख (वय 28) आणि राजेश नागो पंडीत (वय 20), सचिनकुमार सोहनप्रसाद गुप्ता (वय 33), मुन्नाकुमार गेंदालाल शहा (वय 31), मोहम्मद महिरुद्दीन जाकीर (वय 24) आणि महंमद रफीक जाकीर (वय 25) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे नऊ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.
हे सर्व आरोपी मूळ बिहार येथील असून आळंदी येथे भाड्याने रहात होते. त्यांच्याकडे केलेल्या तपासात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याअंतर्गत 4, दिघी पोलिस ठाण्याअंतर्गत 3, विश्रांतवाडी पोलिस ठाण्याकडे नोंद असलेले 2 आणि मुंढवा, सहकारनगर व विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद असलेला प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण बारा गुन्हे उघडकीस आले आहेत.
फसवणूक करणार्या टोळीला अटक
Reviewed by Unknown
on
10:03 PM
Rating:

No comments: