पुणे तिथे ‘आरोग्यप्रमुख’ उणे !!
पद भरण्यास महापालिकेला नाही वेळ; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
सोमनाथ गर्जे
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : ‘स्मार्ट सिटी’च्या गप्पा मारत असलेल्या पुणे महापालिकेला गेल्या सहा वर्षांपासून आरोग्य प्रमुखाचे पदही भरता आलेले नाही. त्यामुळे प्रभारींच्या खांद्यावरच या पदाचा भार देण्यात आला आहे. यातून महापालिकेला पुणेकरांच्या आरोग्याबाबत किती गांभीर्य आहे, ही बाब स्पष्ट होत आहे.
‘स्वाईन फ्लू’ सारखा साथीचा आजार सर्वप्रथम पुण्यात फैलावला. त्यानंतर डेंगी, चिकनगुनिया, कावीळ आदी रोगांचाही वेळोवेळी फैलाव होत आहे. परंतु त्याची झळ मात्र महापालिकेच्या कारभार्यांपर्यंत पोचत नसल्याचे दिसते. महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर दोन भावांमध्ये मालमत्तेची वाटणी केल्याप्रमाणे उपआरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव आणि डॉ. अंजली साबणे या दोघींकडे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदाचा निम्मा-निम्मा कारभार देण्यात आला.
आरोग्य प्रमुखाकडे असलेली औषध खरेदी, महापालिकेच्या रुग्णालयासाठी लागणार्या विविध महागड्या उपकरणांची खरेदी या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रमुख पद हे ‘मोला’चे मानले जाते. त्यामुळे आपल्या हातातील बाहुले असलेल्या विशिष्ट व्यक्तीलाच या पदावर ‘बसविण्या’साठी नियमित हालचाली होत असतात. त्याचाच भाग म्हणून आरोग्य प्रमुख पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेचे निकषही मध्यंतरी बदलण्यात आले. तसेच 5 जानेवारी 2017 रोजी त्यात पुन्हा दुरुस्ती करण्याची उपरती महापालिकेला झाली. या दुरुस्तीला राज्य सरकारची मंजुरी आवश्यक असल्याने हा ठराव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविणे आवश्यक आहे. परंतु सात महिन्यांपासून हा ठराव महापालिकेतच रांगत आहे. ‘स्मार्ट सिटी’ आणि आता ‘चोवीस तास पाणी’पुरवठ्यात ‘व्यस्त’ असलेल्या आयुक्तांनी हा ठराव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविलाच नाही. उलट राज्य सरकारनेच महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदावर अधिकारी पाठवावा, असे पत्र दिले. परंतु राज्य सरकारने त्यासाठी असमर्थता दर्शविली. तरीही या पदावर पूर्ण वेळ अधिकार्याची नेमणूक महापालिकेला करता आली नाही. डॉ. एस. टी. परदेशी निवृत्त झाल्यानंतर तरी या पदावर पूर्णवेळ खातेप्रमुखाची नेमणूक करणे आवश्यक होते. परंतु त्यांच्या निवृत्तीनंतर पंधरा दिवस या पदाचा प्रभार कोणाकडेही देण्यात आला नव्हता. सहाय्यक आरोग्य प्रमुख असलेल्या डॉ. वैशाली जाधव या सर्वांत ज्येष्ठ अधिकार्याकडे या पदाचा प्रभार देण्यात यावा, असा प्रस्ताव अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांनी सामान्य प्रशासन विभागामार्फत दिला होता. परंतु त्याकडे डोळेझाक करून डॉ. जाधव आणि डॉ. साबणे या दोघींकडे आरोग्य विभागाचा प्रभार विभागून देण्यात आला.
खात्याच्या या ‘वाटणी’मागील गौडबंगाल नेमके काय आहे, याबाबत महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे या ‘चर्चे’ला पूर्णविराम देण्यासाठी हितसंबंधांना पूर्णविराम देऊन आरोग्य प्रमुख पदावर स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची नेमणूक करणे आवश्यक आहे. तसे करून महापालिका आयुक्त आपल्या ‘स्मार्ट’ कारभाराची झलक दाखविणार की पुणेकरांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळखंडोबा असाच सुरू राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्यांसाठी Login करा www.namskarpune.com
पुणे तिथे ‘आरोग्यप्रमुख’ उणे !!
Reviewed by Unknown
on
4:00 AM
Rating:

No comments: