‘पीएमआरडीए’कडून कारवाई; वारजेतील ‘बीएसयुपी’ प्रकल्पाला अभय
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : ‘पीएमआरडीए’कडून बांधण्यात येणार्या प्रस्तावित रिंग रोडमध्ये येणारी तब्बल 2 हजार 500 अनधिकृत बांधकामे तातडीने पाडण्यात येणार आहेत. मात्र वारजे येथे महापालिकेने ‘बीएसयुपी’ योजनेेअंतर्गत राबविलेला पुनर्वसन प्रकल्प रिंग रोडच्या हद्दीत येत असल्याने तेथे रिंग रोडसाठी भुयारी मार्ग काढण्यात येणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात ‘पीएमआरडीए’कडून रिंग रोड, मेट्रो, विकास आराखडा तयार करणे आदी कामांना गती देण्यात आली आहे. याबाबतचा आढावा ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महानगर आयुक्त किरणकुमार गित्ते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत घेतला. पीएमआरडीएकडून 129 कि.मी. चा रिंग रोड बांधण्यात येणार आहे. या प्रस्तावित रिंग रोडमध्ये तब्बल अडीच हजार अनधिकृत घरे आहेत. पोलिस बंदोबस्तात ती पाडण्यात येणार आहेत. यातील बहुतांशी बांधकामे ही वारजे परिसरातील आहेत. दरम्यान, पूर्वी रिंग रोड 90 मीटरचा होता. आता रिंग रोडची आखणी 110 मीटरची करण्यात आली आहे. दरम्यान धायरी येथे 90 मीटरचा रिंग रोड गृहित धरून महापालिकेने काही बांधकामांना परवानगी दिली आहे. अशा ठिकाणी रिंग रोडची अलाईनमेंट काही प्रमाणात बदलण्याचाही पर्याय असल्याचे गित्ते यांनी स्पष्ट केले.
...म्हणून अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहिम थंडावली!
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या धडाक्यात सुरू केलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याची ‘पीएमआरडीए’ची मोहिम थंडावली आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना गित्ते म्हणाले, ‘‘सर्वेक्षणानुसार ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत एकूण 1650 अनधिकृत बांधकामे आहेत. त्यापैकी गेल्या काही दिवसांत 63 बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारने दोन आठवड्यांपूर्वी एक अधिसूचना काढली आहे. त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. या अंतर्गत ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील काही अनधिकृत बांधकामे नियमित होऊ शकतील. याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर उर्वरित अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहिम पुन्हा पूर्ण क्षमतेने राबविण्यात येईल.’’
अॅमिनिटी स्पेसवर होस्टेलची उभारणी
अॅमिनिटी स्पेसच्या सुमारे दोनशे जागा ‘पीएमआरडीए’च्या ताब्यात आल्या आहेत. या जागेवर होस्टेल बांधण्यास परवानगी मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविल्याची माहितीही गित्ते यांनी दिली. राज्य सरकारने या प्रस्तावास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुण्यात स्पर्धा परीक्षा अथवा अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची गैरसोय दूर होणार आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांनीही यास अनुकूलता दर्शविल्याचे गित्ते यांनी नमूद केले.
डिसेंबर अखेरपर्यंत मेट्रोची कुदळ
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल. त्यासाठी हा प्रकल्प ‘मुख्यमंत्री वॉर रूम’मध्ये घेण्यात यावा, यासाठी राज्य सरकारला पत्र दिल्याचेही किरणकुमार गित्ते यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी मॉडेल) मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीसोबत 35 वर्षाचा करार करण्यात येईल. त्यासाठी या आठवड्यातच सल्लागाराची (ट्रॅन्झॅक्शन अॅडव्हायझर) नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी क्रिसिल, डिलर्ट, सीआरबी तसेच दिल्ली राज्य सरकारची एक एजन्सीही इच्छुक आहेत. यापैकी एका कंपनीला सल्लागार म्हणून नेमण्यात येईल. मेट्रो उभारणीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उभारण्यात येणार आहे. शिवाय ब्रँडींगच्या माध्यमातून मेट्रो स्थानकांना विशिष्ट कंपनीचे नावही देता येईल. मेट्रोचे एक स्थानक उभारण्यासाठी सुमारे चाळीस ते पन्नास कोटी रुपये खर्च येतो. ‘ब्रँडींग’अंतर्गत कंपनीने हा संपूर्ण खर्च उचलावा अथवा दरवर्षी सुमारे पाच-सहा कोटी रुपये मेट्रोला द्यावेत अशी ही ‘ब्रँडींग’ची संकल्पना आहे. हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीने त्यास अनुकूलताही दर्शविली आहे. याशिवाय बड्या कंपन्यांच्या वेळेनुसार मेट्रोच्या फेर्या ठेवण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे.’’
म्हाळुंगेत पहिली ‘टिपी स्कीम’
निधी उभारणीसाठी ‘पीएमआरडीए’कडून ‘टीपी स्कीम’ उभारण्यात येणार आहे. त्यानुसार म्हाळुंगे येथे 50 हेक्टर जागेत पहिली ‘टीपी स्कीम’ उभारण्यात येणार आहे. येथे दोन मोठ्या आयटी कंपन्यांसाठी जागा उपलब्ध करून देऊ शकतो, असे गित्ते यांनी सांगितले.
‘त्या’ अडीच हजार बांधकामांवर लवकरच बुलडोझर !
Reviewed by Unknown
on
10:58 AM
Rating:
Reviewed by Unknown
on
10:58 AM
Rating:

No comments: